ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक   

रुरकेला : सुरक्षा दल गेले काही दिवस जोरदार कारवाया करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले. तरी देखील नक्षलवादाचा पूर्ण बीमोड झालेला नाही. तसेच त्यांचे  आव्हान सुरक्षा दल आणि सरकार समोर कायम आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले असून, ओडिशा येथील रुरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल दीड हजार किलो स्फोटके असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशामध्ये पोलीस सतर्क झाले आहेत.
 
नक्षलवाद्यांनी लुटलेला ट्रक हा रुरकेला येथील केबलांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांको दगड खाणीकडे जात होता. नक्षलवाद्यांनी ट्रक अडवून त्यातील चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर ट्रक जबरदस्तीने सागंडा येथील घनदाट जंगलांच्या दिशेने नेला.
 
सुरक्षा दलाच्या कारवाईत बरेच नक्षलवादी मारले गेले आहेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र तरीही महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा राज्याच्या काही भागात नक्षलवाद्यांचे आव्हान कायम आहे. 
 

Related Articles